प्रेरणा inspiration

प्रेरणा inspiration

Friday, May 15, 2009

दीपस्तंभ - होटगी मठ

सोलापुरातील अक्कलकोट रोडवरील चन्नवीर नगरात श्री बृहन्मठ होटगी मठातर्फे गेल्या दहा दिवसांपासून धर्माचा मोठा उत्सव सुरू आहे. येथे दररोज सकाळी-संध्याकाळी वेगवेगळ्या गावांहून आलेले एक हजार दांपत्य महामृत्युंजय होम आणि सहस्त्रचंडी यज्ञात सहभागी होत आहेत. दररोज 10 हजार भाविक अन्नदानाचा लाभ घेत आहेत. आध्यात्मिक प्रवचनमाला सुरू आहे. वीरतपस्वी आणि अन्य मूर्तींची प्रतिष्ठापना, लक्षदीपोत्सव, कुंभोत्सव, नूतन मठाधिशांचा पट्टाभिषेक, 108 फुटी विशाल महाद्वार (राजगोपूर) उद्‌घाटन, अय्यचार, शिवलिंग दीक्षा विधी, 125 सामुदायिक विवाह अशा अनेक उत्सवांचा महासोहळा सुरू आहे.
होटगी मठाच्या वाटचालीतला हा महत्त्वाचा क्षण आहे. गेल्या शंभरहून अधिक वर्षांपासून आध्यात्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात समर्पित भावाने मठाचे कार्य सुरू आहे. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णप्पा (ए.जी.) कुंभार हे गेल्या साडेतीन दशकांपासून निष्ठेने कार्यरत आहेत. त्यांच्याशी झालेल्या संवादावर आधारित होटगी मठाच्या यशस्वी वाटचालीवर प्रकाश टाकणाऱ्या लेखाचा पहिला भाग येथे देत आहोत.


वीरशैवांची 5 धर्मपीठं आहेत. यापैकी श्रीशैल पीठाच्या कार्यक्षेत्रात होटगी मठ येतं. मठाची गादीपद्धती आहे. बालब्रह्मचारी जंगम बटू या गादीवर आरूढ होऊ शकतात. मठपती म्हणून ते धर्मकार्य पाहतात.
होटगी मठाचे आजवर अनेक मठाधिश होऊन गेले आहेत; त्यापैकी वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य यांचा कार्यकाल अलीकडचा आहे आणि विशेष उल्लेखनीयसुद्धा आहे.
कर्नाटक राज्यात सगरनाडू क्षेत्र प्रसिद्ध आहे. या क्षेत्रातील सुरपूर तालुक्यात (जि. गुलबर्गा) तळवारगेरी या गावी 10 ऑक्टोबर 1907 रोजी चन्नवीर शिवाचार्य यांचा जन्म झाला. स्वामींचे बालपणीचे नाव सिद्धलिंगय्या होते. सिद्धलिंगय्याची कुशाग्र बुद्धी पाहून शिक्षक अवाक्‌ झाले होते. या बालकाला चांगल्या ठिकाणी शिक्षणासाठी पाठवून द्या, अशी सूचना अनेकांनी केली. सिद्धलिंगय्याला सोलापुरातील वारद संस्कृत पाठशाळेत दाखल करण्यात आले. (ही पाठशाळा आता बंद आहे.)
बाल सिद्धलिंगय्याचे शिक्षण सुरू होते. याचवेळी होटगी मठाची गादी रिक्त होती. होटगीचे ग्रामस्थ बटूच्या शोधात वारद पाठशाळेत आले आणि त्यांनी सिद्धलिंगय्या तथा चन्नवीर स्वामींना होटगी मठासाठी स्वीकारले.
1923 साली होटगी मठासाठी चन्नवीर स्वामींचा पट्टाभिषेक झाला. चन्नवीर महास्वामीजी म्हणजे एक वेगळेच रसायन होते. मठाधिपती झाल्यानंतर स्वामींनी मठाच्या कार्यक्षेत्रातील गावांना पदयात्रा काढायला सुरुवात केली. भक्तांचे रहाणीमान, शिक्षणाची व्यवस्था, गावांमधील स्थिती आदी जाणून घेऊ लागले. शिक्षणाचा अभाव, संस्कारांचा अभाव, संस्कारांच्या अभावामुळे गावांमधील कलह, काठ्या-कुऱ्हाडींचा वापर यामुळे सामाजिक शांती हरवल्याचे स्वामींना दिसून आले.
स्वामींनी गावोगावी जाऊन धर्मोपदेश द्यायला सुरुवात केली. लोकांमध्ये सहकार्याची भावना वाढीस लागावी, वैरभावना नष्ट व्हावी, जीवन आनंददायी व्हावे यासाठी स्वामीजी उपदेश करू लागले. स्वामींनी पशूहत्या थांबविली. आर्थिक पिळवणूक थांबविली. अनेक दुष्ट रूढी लोकांपुढे चर्चेसाठी ठेवून प्रबोधन घडवून आणले.
यावेळी होटगी मठ कसे होते हे पाहणे महत्त्वाचे आहे. कोणतेही बांधकाम नाही. आसऱ्यासाठी 15 पत्रे मात्र आहेत. स्वामीजी सतत गावोगाव पदयात्रा काढीत होते. सोलापुरात मल्लिकार्जुन मंदिराजवळील हिरेहब्बू रेवणसिद्ध यांच्याकडे स्वामींचा मुक्काम असायचा. त्यानंतर थोडे दिवस ते फराळप्पा मठात राहू लागले.
सोलापूर हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे स्वामींचे येणे वाढू लागले; परंतु सोलापुरात होटगी मठाला स्वत:च्या मालकीची जागा नव्हती. सिद्रामप्पा वाकळे यांनी उत्तर कसब्यातील स्वत:च्या मालकीची जागा होटगी मठासाठी दिली. 1939 साली उत्तर कसब्यातील भक्तांनी एकत्र येऊन नागप्पा अब्दुलपूरकर यांच्या नेतृत्त्वाखाली होटगी मठाचे बांधकाम सुरू केले. यानंतर स्वामींचे सोलापुरातील वास्तव्य वाढले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शहरात आल्यानंतर सोय होत नाही हे पाहून स्वामींनी भवानी पेठेते सिद्धलिंग आश्रमाची भव्य इमारत उभी केली. येथे ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय झाली. अशा प्रकारे स्वामींचे धर्मजागृती आणि शैक्षणिक कार्य अखंडपणे सुरू होते.
स्वामीजी प्रत्येक वर्षी श्रावणमास, धनुर्मास आणि नवरात्रात अनुष्ठानाला बसायचे. त्यांचे अनुष्ठान म्हणजे खडतर तपस्याच असायची. अनुष्ठानकाळात वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव पाहावयास मिळायचे. स्वामींनी एकूण 33 अनुष्ठाने केली. स्वीमीजी बालपणापासूनच पूजा आणि आध्यात्मिक साधनेत स्वत:ला विसरून जायचे. जगद्‌गुरूंनी त्यांना लहानपणीच बालतपस्वी ही पदवी बहाल केली होती. अनेक अनुष्ठाने करून स्वामींनी तपोबल धारण केले होते. पुढे त्यांची वीरतपस्वी म्हणून गणना होऊ लागली.
वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य यांनी विपुल साहित्यरचना केली आहे. तथाकथित उच्चवर्णीय आणि निम्नवर्णीय हा भेद वृथा आहे. ब्राह्मणाइतकेच अन्य जातीचे लोकही श्रेष्ठ आहेत, असा विचार स्वामींनी साहित्यातून मांडला. स्वामीजींनी एकूण 18 नाटके लिहिली. विजयपुराण, भंगारबट्टल ही विख्यात नाटके स्वामींनीच लिहिली आहेत.
वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महाराज हे द्रष्टे महापुरुष होते. आगामी शेकडो वर्षांच्या धर्मकार्याचा विचार त्यांनी केला होता. त्यामुळेच 1945 साली अक्कलकोट रोडवरील 48 एकर शेतजमीन महास्वामींनी श्री जोडभावी यांच्याकडून खरेदी केली. ही जमीन उपजाऊ नसली तरी भविष्यात धर्मकार्यासाठी ही पवित्र भूमी महत्त्वाची ठरेल, असे ते म्हणायचे. आज याच भूमीवर भव्य मंदिर आणि गोपुराची उभारणी झाली आहे.
दुर्दैवाने 6 फेब्रुवारी 1956 रोजी वीरतपस्वी शिवैक्य झाले आणि मठाची गादी पुन्हा रिक्त झाली.
( तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्यांचे आगमन आणि त्यानंतर आजवर झालेली मठाची शैक्षणिक व आध्यात्मिक क्षेत्रातली तेजस्वी वाटचाल वाचा, रविवार दि. 17 मे च्या आसमंत पुरवणीमध्ये )
-सिद्धाराम भै. पााटील

No comments:

Post a Comment

About Me

siddharam b patil, journalist. sub-editor in marathi daily tarun bharat. i m x-student of veertapasvi channaveer shivacharya prashala. taporatnam yogirajendra shivacharya is inspiring monk.